मुंबई : ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलं आहे. ५ जुलैला हे दोघंही मुंबईत एका मोर्च्याच्या निमित्ताने एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी थेट प्रतिक्रिया दिली असून, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत.
“दोन भाऊ एकत्र आले, म्हणजे काय?”
नारायण राणे म्हणाले, “दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी एवढा गवगवा का? एकमेकांच्या घरी जा, जेवू घाला आणि मिठी मारा. त्यात एवढं काय विशेष आहे? यासाठी ‘मराठी’ नावाचा विषय निवडायचा, आणि त्याच नावावर एकत्र येण्याचा नाटक करायचं – हे लोक करत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी, त्याच्या नोकऱ्यांसाठी, गरिबीसाठी काय केलं? काहीच नाही. आता मराठीसाठी मोर्चा काढून आपलं राजकीय हित साधायचं, एवढाच खरा हेतू दिसतो.”
“उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना बाहेर जाण्यास भाग पाडलं”
राणेंनी यावेळी एक मोठा गौप्यस्फोट केला. “उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना शिवसेनेत राहणं असह्य केलं. त्यांनी राजसमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नव्हता. त्यामुळेच राज ठाकरेंनी वेगळी वाट धरली,” असा थेट आरोप त्यांनी केला.
“उद्धव ठाकरे मिठी मारू इच्छितात, पण कृती कुठे?”
“मिठी मारायची असेल, तर थेट राज ठाकरेंच्या घरी जावं. त्यांना सांगावं – चल परत मातोश्रीवर. हे उद्धव ठाकरे करू शकतील का? नाही. कारण राजनेच एक पाऊल पुढे टाकलं आहे. तो प्रयत्नशील आहे. उद्धव यांच्यात तसा मोठेपणा नाही,” असंही राणे म्हणाले.
राजसाठी कौतुक, उद्धव यांच्यावर टीका
नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे एकही चांगले गुण मला माहिती नाहीत. त्यांनी कायम वाईटच दाखवलं आहे. राज ठाकरेंनी मात्र अनेक वेळा चांगल्याचं कौतुक केलं आहे, दुसऱ्यांना प्रोत्साहन दिलं आहे.”
“पहिल्यांदा एकत्र येऊ देत, मग चर्चा करा”
अखेर राणेंनी टोला लगावत म्हटलं, “सध्या चर्चा होते आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार. पहिल्यांदा एकत्र येऊ देत, एकत्र राहू देत. त्यानंतर परिणामांची चर्चा करावी.”
नारायण राणेंचं हे वक्तव्य फक्त एक टीका नाही, तर भविष्यातील संभाव्य ठाकरे-ठाकरे एकत्रीकरणावर प्रश्नचिन्ह आहे. भाजपमध्ये असलेले राणे, हे दोघं पुन्हा एकत्र आल्यास महाविकास आघाडीच्या राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे पाहत आहेत.
५ जुलैचा मोर्चा हा केवळ ‘मराठी’साठी आहे की त्यामागे मोठा राजकीय अजेंडा दडला आहे? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.